“नात्यांची नितीमूल्य जपली; बहिणींनी दिला सामाजिकतेचा संदेश”
लोणीकंद (ता. हवेली): आजच्या काळात जमिनींच्या वाढत्या किमतींमुळे वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून नात्यांमध्ये वाद होणं ही दुर्दैवी बाब ठरत आहे. मात्र लोणीकंद गावातील कंद कुटुंबातील बहीणींनी आपल्या भावांना हक्कसोडपत्र देऊन एक समाजाला प्रेरणा देणारा आदर्श निर्माण केला आहे.
कै. आदिनाथ आनंदराव कंद व कै. उत्तम आनंदराव कंद यांच्या वारसांमध्ये असलेल्या कविता दत्तात्रय बोडके, ज्योती पोपट मांजरे, मंजुश्री विशाल घुले आणि मयुरी उत्तम कंद या बहीणींनी भावांकडे वडिलोपार्जित संपत्तीचा हक्क सोडत एक सामाजिक संदेश दिला आहे.
हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मुलींचाही वडिलोपार्जित मालमत्तेवर समान अधिकार असतो. मात्र, वडिलांच्या निधनानंतर भावांनी आम्हाला कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही, तसेच समाजासाठी काही देणे लागते, या भावनेतून आम्ही हा निर्णय घेतल्याचे या बहिणींनी सांगितले.
हा निर्णय केवळ कौटुंबिक सलोखा टिकवण्यासाठी नव्हे, तर समाजामध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचावा आणि इतरांसाठी आदर्श घालून द्यावा या हेतूने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या स्तुत्य पावलाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, कंद कुटुंबीयांच्या या निर्णयामुळे सामाजिक एकतेचा आणि कुटुंबातल्या जिव्हाळ्याचा उत्तम परिचय समाजाला झाला आहे.