मुंबई : राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या नावात “धर्मादाय” अथवा “चॅरीटेबल” हा शब्द ठळकपणे नमूद करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, नागरिकांना स्पष्ट माहिती मिळावी व पारदर्शकता राहावी या उद्देशाने ही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.
अनेक रुग्णालये केवळ नाममात्र, लहान अक्षरात, किंवा न दिसणाऱ्या स्टिकर्सच्या स्वरूपात “धर्मादाय” शब्द वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो व अशा रुग्णालयांच्या चारित्र्याबाबत प्रश्न निर्माण होतात, असे सेवाभावी संस्थांचे म्हणणे आहे.
नव्या सूचनेनुसार, “धर्मादाय” वा “चॅरीटेबल” हा शब्द किमान २ इंच × ४ इंच आकारात पेंट करून किंवा रुग्णालयाच्या नावाच्या समप्रमाणात कायमस्वरूपी स्वरूपात लिहिणे अनिवार्य आहे. हा शब्द नागरिकांच्या नजरेस सहज पडेल, अशा ठिकाणी लावणेही गरजेचे आहे.
राज्यातील सर्व धर्मादाय आयुक्त कार्यालयांमार्फत ही अंमलबजावणी होणार असून, एक महिन्याच्या आत ही सुधारणा रुग्णालयांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित विभागांनी कार्यपुर्ततेचा अहवाल मुख्यालयास सादर करावयाचा आहे.
हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, धर्मादाय संस्थांची पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढविण्यास निश्चितच मदत करेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.