वाघोली (ता. हवेली) परिसरात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध मटका व जुगारधंद्यांवर आवाज उठवणाऱ्या एका नागरिकाला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या संदर्भात पीडित नागरिक आकाश मनोज गाडेकर यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
गाडेकर यांच्या तक्रारीनुसार, गणेश ठाकुर, बादल ठाकुर आणि अमोल ठाकुर या तिघांकडून अवैध धंद्यांविरोधात बोलल्यामुळे त्यांना दमदाटी करण्यात आली असून, एका अनोळखी नंबरवरून फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ३ एप्रिल रोजी ९७६२****** या क्रमांकावरून धमकी आली असून, त्याच दिवशी MH12-***** क्रमांकाची फॉरच्युनर गाडी वारंवार त्यांच्या घरासमोर संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आली, असा आरोप त्यांनी केला आहे.
सदर अवैध धंदे वाघोली पोलीस स्टेशनच्या अगदी पाठीमागेच गावठाण आणि गायरान हद्दीत सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या गुन्हेगारी टोळीत अल्पवयीन बाल गुन्हेगारांचा देखील सहभाग असून, या ठिकाणी येणाऱ्या लोकांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. अनेक गोरगरीब कुटुंबांतील महिला यामुळे त्रस्त असून, त्यांच्या संसारात दारू व जुगारामुळे उद्भवणाऱ्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.
“मी या धंद्याविरोधात आवाज उठवला म्हणून मला धमकावलं जात आहे. पोलिसांनी जर याकडे दुर्लक्ष केलं, तर माझ्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो,” असं गाडेकर यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केलं आहे.
या प्रकारामुळे वाघोलीतील सामाजिक शांततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून, नागरिक आता पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.