पुणे अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा नदी पुलावर रिक्षा चालकाचे दहशत माजवत, लोखंडी रॉडच्या साहाय्याने चार चाकी गाडीच्या काच फोडून गाडीतील व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे वाघोली कडून अहिल्यानगर कडे निघालेल्या रिक्षाचालक व कार चालक यांच्यात वाघोली परिसरात किरकोळ कारणावरून वादावादी झाली , त्यानंतर रिक्षा चालकाने कार चालकाचा पाठलाग करत , कोरेगाव भीमा येथील पुलावरती कारला रिक्षा आडवी लावत रिक्षा चालकाकडून लोखंडी रॉडच्या साहाय्याने कारच्या काचा फोडत गाडीमध्ये असलेल्या महिला व व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला, यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे .
गेल्या काही दिवसापूर्वी याच कोरेगाव भीमा येथील पुलाजवळ दोन रिक्षा चालकांच्या वादात एका रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. तर पुन्हा आता एका रिक्षा चालकाकडून कारची काच फोडत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केल्याने रिक्षाचालकांच्या अरेरावीचा , दहशतीच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे.
पुणे अहिल्यानगर महामार्गावर रिक्षाचालकांकडून सर्रासपणे अवैध प्रवास वाहतूक केली जाते, या अवैध प्रवासी वाहतुकीला पुणे शहर पोलीस व पुणे ग्रामीण पोलिसांकडून अभय मिळत असल्याने तसेच रिक्षाचालकांकडून पुणे शहर पोलीस व पुणे ग्रामीण पोलीस चिरीमिरी घेत असल्याने रिक्षा चालकांमध्ये पोलिसांबाबत भीती राहिली नसून रिक्षाचालकांच्या अरेरावी मध्ये वाढ झाल्याचे नागरिक खाजगीत बोलू लागले आहे.
त्यामुळे आता तरी पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस अवैध वाहतूक करणाऱ्या व अरेरावी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे.