लोणीकंद; उन्हाळी वाळवण म्हणजे आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची खास ओळख आहे, उन्हाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये शेवया, पापड, कुरडया, सांडगे, वेफर्स, उपवासाचे साबुदाणा पापड आदी पदार्थ बनविण्यासाठी लगबग सुरू आहे, खेडे गावात वाळवण करणे म्हणजे आजही एक उत्सव मानला जातो.
उन्हाळी वाळवण ही वर्षभर टिकणारी गोष्ट असल्यामुळे ग्रामीण भागात सणासुदीला तळणाचा बेत ताटात असतोच. ग्रामीण भागातील महिलांनी आजही ही परंपरा जपली आहे. एकमेकींच्या मदतीने अंगणात उन्हाच्या आधी ही कामे उरकण्याची लगबग दिसून येत आहे.
पावसाची चाहुल लागण्यापूर्वी पावसाळ्याची बेगमी करताना उन्हाळी कामे म्हणून केले जाणारे हे वाळवणाचे पदार्थ बाजारात सर्रास तयार मिळू लागल्याने शहरी संस्कृतीमध्ये अशा कामांना अभावानेच वेळ दिला जातो. ग्रामीण भागात मात्र महिलांमध्ये असे पदार्थ एकत्रित येऊन बनविण्याचा अट्टहास दिसून येत असल्याचे, ग्रामीण भागातील महिला सांगतात, ग्रामीण भागात अनेकांच्या घरासमोरील अंगणातील एखाद्या कोपर्यात बाज टाकली जाते आणि त्या बाजेवर हे पदार्थ वाळत घातल्याचे दिसून येतात.