उत्सुकतेचा कळस… फक्त सस्पेन्स आणि सस्पेन्स…
लोणीकंद (ता. हवेली) शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सस्पेन्स वाढला आहे. आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत अनेक प्रश्ने उपस्थित होत असून भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात उमेदवारीबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिरूर हवेलीमधील भाजपचे निवडणूक प्रमुख प्रदीप कंद यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून या निवडणुकीसाठी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. यावेळी क्रीडा आघाडीचे पै. संदीप भोंडवे, हवेली तालुकाध्यक्ष शाम गावडे, शिरूर तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, कामगार आघाडीचे जयेश शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली.
पारंपरिक मतदार संघावर अधिकार का?
शिरूर हवेली भाजपचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “पुढील आमदार भाजपचाच पाहायला मिळेल” असा आत्मविश्वास व्यक्त करत, गेल्या पाच वर्षांत या मतदार संघात भाजपने केलेल्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला.
भाजप नेत्यांच्या मते, या मतदार संघाची मागणी केवळ पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नसून कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मतदार संघ आवश्यक असल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगतात.
कार्यकर्त्यांच्या भावना – थेट लढतीची अपेक्षा –
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना असून, ही निवडणूक थेट लढत म्हणून पाहिली जावी अशी मागणी केली जात आहे. क्रीडा आघाडीचे संदीप भोंडवे यांनी भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दृढ असल्याचे सांगितले आहे.
शिरूर हवेली विधानसभेत या सस्पेन्सने राजकीय रंग आणला असून पुढील काही दिवसांत भाजपकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.