पुणे, दि. ४ : जिल्ह्यातील कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्वीप व्यवस्थापन कक्ष व भटके, विमुक्त व आदिवासी संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे मतदार जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली.
शिरूर येथील मतदार जनजागृती मोहिमेत उपजिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांच्यासह २०० ते २५० महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी श्रीमती तांबे म्हणाल्या, जिल्ह्यातील भटके, विमुक्त, आदिवासी समाजातील नागरिकांची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या वतीने विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदानाचा निर्धार करावा.
आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातींना निवडणुकीच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व पात्र मतदारांना मतदान ओळखपत्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. लोकशाहीमध्ये मतदान करणे हे आपले प्रमुख कर्तव्य असून प्रत्येकाने आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाबाबत आपल्या परिसरातील नागरिकांना व मित्र परिवाराला जागृत करावे, असे आवाहनही श्रीमती तांबे यांनी केले. या वेळी उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.