अहमदनगर शहर व परिसरातून मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांनी माळीवाडा परिसरातून आरोपीला अटक केली असून ९० हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.विनोद कडुबा सरकाळे (रा. शहर टाकळी, ता.शेवगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलिसांना सूचना केल्या होत्या. टीम कडून गेल्या ४ महिन्यात कोतवाली पोलीस ठाण्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून चोरी गेलेल्या २७ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. माळीवाडा परिसरात मोटरसायकल चोरी करणारा सराईत आरोपी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपीला सापळा लावून शिताफिने ताब्यात घेतले. शहरातील गौरी घुमट येथून मोटर सायकल चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली असून, त्याच्याकडून तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोना शाहिद शेख, रविंद्र टकले, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले, नितीन शिंदे, राहूल गुंड यांनी ही दमदार कारवाई केली आहे.